*******विरुद्ध आहार व औषध घेऊ नका******
*****विरुद्ध आहार व औषध म्हणजे काय?
जे औषध किंवा आहार वात-पित्त-कफ दोषांना वाढवतात, शरीरात पसरवतात व वाढलेल्या त्या दोषांना शरीराच्या बाहेर काढून टाकत नाहीत, त्या आहार व औषधाला विरुद्ध म्हणतात.
*** ते शरीराला अतिशय अपायकारक आहेत.
आयुर्वेदात विरुद्ध अठरा(18) प्रकारचे सांगितले आहेत. संदर्भ च. सू. 26/81-101
- देश विरुद्ध - जसे उष्ण प्रदेशात उष्ण, रुक्ष, तीक्ष्ण, औषध व आहार हा देशाविरुद्ध आहे. विदर्भातील, मराठवाडय़ातील लोकांनी मिरचीचा ठेचा खाणे.
- काल विरुद्ध -हिवाळ्यात थंड पदार्थ खाणे हे काल विरुद्ध आहे. जसे हिवाळ्यात आईस्क्रीम, कुल्फी खाणे
- अग्नि विरुद्ध- पचनशक्ती कमी असताना जड पदार्थ खाणे, तसेच तीक्ष्ण पचनशक्ती असताना लाह्या सारखे हलके पदार्थ खाणे हे अग्नी विरुद्ध आहे
- मात्रा विरुद्ध- तूप आणि मध समप्रमाणात घेणे हे मात्रा विरुद्ध आहे. तसेच भूक लागली असतांना कमी जेवणे व आवश्यकतेपेक्षा अधिक मात्रेत भोजन करणे हे मात्रा विरुद्ध आहे
- सात्म्य विरुद्ध- एखाद्याला उष्ण, तिखट पदार्थ सात्म्य झाले असतिल तर त्याला गोड, थंड पदार्थ देणे सात्म्य विरुद्ध आहे.
- दोष विरुद्ध - वातादी दोषांच्या समान गुणांचे पदार्थ,समान गुणाचे औषध व समान गुणाचे कर्म हे दोषविरुद्ध आहे. जसे अधिक चालणे हे वात विरुद्ध, दिवसा झोपणे हे कफासाठी विरुद्ध, क्रोध करणे पित्तासाठी विरुद्ध आहे.
- संस्कार विरुद्ध - आहार बनविण्याच्या पद्धतीला संस्कार म्हटले आहे. जसे मध गरम करणे विषाप्रमाणे आहे. अर्धे कच्चे, अधिक शिजवलेले, करपलेले, पुन्हापुन्हा गरम केलेले अन्न, उच्च तापमान वर शिजवलेले - जसे– फास्टफूड, अति थंड तापमान त ठेवलेले पदार्थ – फ्रिज मधिल पाणी, फ्रीजमध्ये ठेवलेले शिजवलेले अन्न संस्कार विरुद्ध आहे
- वीर्य विरुद्ध - शीत व उष्ण गुणाचे पदार्थ एकत्र घेणे वीर्य विरुद्ध आहे. ह्याने रक्त दूषित होते.
जसे दूध व मासे एकत्र घेणे. पिझ्झा व आईस्क्रीम/थंड पेय एकावेळी खाणे.
- कोष्ठ विरुद्ध-आपला कोठा कसा आहे ह्याचा विचार करुन खावे. जसे जड कोठा असणाऱ्या व्यक्ती ने मलावष्टंभ करणारी पदार्थ खाऊ नये. हलका कोठा असणाऱ्यांनी सारक पदार्थ घेणे कोष्ठ विरुद्ध आहे
- अवस्था विरुद्ध - शरीराची अवस्था च्या विरुध्द आहार घेऊ नये. जसे जागरण झाल्यावर वडापाव खाणे, ह्यामुळे पित्त वाढते. दिवसा झोपून त्यानंतर श्रीखंड खाणे हे अवस्था विरुद्ध आहे, त्यामुळे कफ वाढतो.
- क्रमविरुद्ध- आयुर्वेदानुसार आहार घेण्यासाठी एक क्रम सांगितला आहे. तो क्रम न पाळणे ह्याला क्रम विरुद्ध-म्हणतात.जसे मल मूत्रप्रवृत्ती करुन झाल्यावर, शरीराला हलकेपणा आल्यावर, उद्गार शुद्धी झाल्यावर, शरीर व मन उल्हास युक्त असतांना, भोजनाची इच्छा निर्माण झाल्यावर भोजन करणे आवश्यक आहे
- परिहारविरुद्ध-विशिष्ट पदार्थावर विशेष पदार्थ खाऊ नये. जसे सिताफळ खाल्ल्यावर पाणी पिऊ नये.
- उपचार विरुद्ध -उपचार चालू असतांना पथ्यापथ्यानुसार न वागणे ह्याला उपचार विरुद्ध म्हणतात . जसे औषधी तूप घेतल्यावर थंड पाणी पिऊ नये.
- पाकविरुद्ध-आहार शिजवण्याची प्रक्रिया योग्य नसणे. जसे तांदुळ खुप शिजवणे किंवा अर्धेकच्चे ठेवणे. अयोग्य इंधन, जसे केरोसिन, आरोग्याला योग्य नही.
- संयोग विरुध्द - निरनिराळे पदार्थ एकत्र करुन खाण्याला संयोग विरुध्द म्हणतात. जसे मांसाहार करताना सोबत मध, तिळ, गुळ, उडीद, मूळी, मोड आलेली धान्य खाणे हे संयोग विरुध्द आहे.
- ह्दयविरुद्ध- जो आहार मनोनुकूल नाही त्याला ह्दयविरुद्ध म्हणतात.मनोनुकूल नसेल तर ते नीट पचत नाही
- संपत् विरुद्ध - आपण आहारासाठी जे धान्य, पाणी, भाजीपाला इत्यादी घेतो ते भेसळयुक्त, केमिकल्स युक्त असणे हे संपत विरुद्ध आहे.
- विधी विरुद्ध - भोजन कसे करावे ह्याची आयुर्वेदाने पद्धत सांगितली आहे. त्या पद्धतीने न केल्यास त्याला विधीविरुध्द म्हणतात.
*****अशाप्रकारे निरोगी राहण्यासाठी असे 18 प्रकारच्या विरुद्ध गोष्टी आपल्या हातून घडणार नाही ही काळजी घ्यावी **********
No comments:
Post a Comment